मानवी इतिहासात हे सदैव असेच चालत आले आहे का? आत्मवंचना करत जगत राहण्याखेरीज काही इलाज नाही का?
बालवयात, तरुण वयात, मनाच्या तुलनेने अधिक अपिरपक्व अवस्थेत ज्याला आपण संस्कृती संस्कृती समजत आलो तशी कधी संस्कृती होती का?
गायन, वादन, नर्तन वगैरे कला देवळांच्या परिसरात वाढल्या म्हणतात. कला आपोआप थोड्याच वाढतात? त्या वाढवणारी हाडामांसाची माणसे असतात. त्या गायिका, त्या गायिका, नर्तिका ह्मांना न गाण्याचे किंवा न नाचण्याचे स्वातंत्र्य होते का? एखाद्या गणिकेच्या कन्येला गावातल्या देवदर्शनाला येणाऱ्या स्रिसारखे आपल्या नवऱ्याशेजारी बसून त्या देवाची पूजा करण्याचे भाग्य लाभावे असे वाटले तर तिचे कुणी सालंकृत कन्यादान केल्याचा कुठे इतिहास आहे का? की कुत्र्याच्या जन्मकाळा पासून त्याला हाडकावरच वाढल्यामुळे, पुरणपोळी ही आपल्या खाण्याची वस्तूच नव्हे असे त्याला वाटावे, तसे त्या नर्तकींना लग्न ही आपल्या कामाचीच गोष्ट नव्हे असे आपण वाटायला लावले? अशा अनेक प्रश्नांचे मोहोळ उठते. आणि कुठलेही मोहोळ उठले, की अंगावर फक्त डंख उठवणाऱ्या माशांशी मुकाबला करुन प्रत्येक जण त्याचा तो राहतो, तशी काहीशी माझी अवस्था झाली आहे.
डोक्याला ही प्रश्नांची सवय लागलीच मुळी कशासाठी? डोळयांवर आघात करणाऱ्या गोष्टी टाळायच्या असतील तर डोळे त्या गोष्टींकडून दुसरीकडे फिरवता यायला हवेत! स्वत:च्या अपूर्णतेची जाणीव होत असताना अपूर्णाची पूर्णावस्था शून्याच्याकडेच स्वत:ला नेताना दिसते.
-एक शुन्य मी
